गुन्हे
मुंबई अहमदाबाद महामार्गावर घोडागाडी शर्यत; ६ घोडे जप्त, तिघांना अटक

भाईंदर : मुंबई अहमदाबाद महामार्गाजवळील वरसावे येथे घोडागाडी शर्यत आयोजित करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी प्राण्यांसाठी काम करणार्या पेटा संस्थेने दिलेल्या तक्रारीनुसार काशिगाव पोलिसांनी कारवाई करून ६ घोड्यांची सुटका केली आणि ३ जणांना अटक करण्यात आली आहे. वरसावे पुलावर मध्यरात्री घोडागाडी शर्यत होणार असल्याची माहिती पेटा (पिपल फॉर द एथिकल ट्रिटमेंट ऑफ ॲनिमल) या प्राण्यांसाठी काम करणार्या संस्थेने मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तांना दिली होती. त्यानुसार मध्यरात्री काशिगाव पोलिसांनी या वरसावे नाका परिसरात गस्त घातली होती. रात्री साडेबाराच्या सुमारास काही तरुणांचा गट घोडागाडी शर्यत करत असल्याचे आढळून आले. पोलिसांच्या पथकाने त्यांना अडवून ताब्यात घेतले आणि घोड्यांची सुटका केली.



