प्रवाशांना लुटणारी रिक्षा चालकांची टोळी जेरबंद; स्वारगेट पोलिसांची धडक कारवाई

पुणे : पुणे शहरात गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याचे पाहायला मिळत आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटना देखील सातत्याने घडत आहेत. बोपदेव घाटात झालेल्या अत्याचारातील आरोपीना शोधण्याचे काम पुणे पोलिसांकडून वेगाने सुरू आहे. मात्र आता पुण्यात एक रिक्षा चलकांच्या टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. परगावाहून आलेल्या प्रवाशांना रिक्षात घेऊन त्यांना वाटेत रिक्षा थांबवून हत्याराच्या धाकाने लुटणाऱ्या रिक्षा चालकांच्या टोळीला स्वारगेट पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. स्वारगेट येथून ते प्रवाशांना इच्छितस्थळी नेण्याच्या बहाण्याने रिक्षात घेत असत. पोलिसांनी तब्बल १०० ते १५० सीसीटीव्ही तपासत आरोपींचा माग काढला आहे. स्वारगेट येथील पीएमपी बसस्टँडपासून एका तरुणाला रात्री साडेनऊच्या सुमारास इच्छितस्थळी सोडण्यासाठी रिक्षाने घेतले होते. मात्र, रिक्षा काही अंतरावर गेल्यावर चालकाने फोन करायचा म्हणून त्याच्याकडून मोबाईल घेतला. रिक्षा पर्वती इंडस्ट्रीज जवळील आल्यानंतर रिक्षा तरुणाने सांगितल्यानूसार न घेता लुल्लानगर परिसरात नेली. त्याठिकाणी या प्रवाशी तरुणाकडील ५०० रुपये तसेच गळ्यातील चांदीची चैन व मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला. तसेच ४ हजार रुपये ऑनलाईन मागवून घेऊन मोबाईलचा पासवर्डने तेही पैसे ट्रान्सफर केले होते. या गुन्ह्याचा तपास करताना परिसरातील १०० ते १५० सीसीटीव्ही फुटेज तपासले. तांत्रिक विश्लेषणातून आरोपींची माहिती मिळाली. आरोपी रोहित चव्हाणला त्याच्या घरातून ताब्यात घेतले. चौकशी केली असता त्याने साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर दोघांना पोलिसांनी अटक केली. चोरी केलेला माल व गुन्ह्यात वापरलेली रिक्षा असा ८० हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.
रोहित सुभाष चव्हाण (वय २३, रा. गंगानगर, भेकराईनगर, फुरसुंगी, हडपसर) हा रिक्षाचालक व त्याचे साथीदार मयुर ऊर्फ संकेत प्रकाश चव्हाण (वय १९, रा. मंतरवाडी, देवाची ऊरुळी) आणि सुदर्शन शिवाजी कांबळे (वय २२, रा. म्हाडा कॉलनी, वारजे माळवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ही कामगिरी पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे व पथकातील उपनिरीक्षक रवींद्र कस्पटे, टोणपे यांनी केली आहे. आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर सिंहगड रोड, बंडगार्डन, बिबवेवाडी, भारती विद्यापीठ व स्वारगेट पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.



