मिरा रोड शॉपिंग सेंटर मधील गोळीबारात दुकानदाराचा मृत्यू; हल्लेखोर फरार

भाईंदर : मुंबईतील मीरा रोड परिसरात अंतर्गत वादातून गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली असून यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. युसुफ अन्सारी असे गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचे नाव असून यामध्ये सोनू नावाच्या इसमाचा जागीच मृत्यू झाला. वर्दळीच्या ठिकाणी गोळीबाराची घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की, मीरा रोड मधील नया नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या शांती शॉपिंग सेंटर मध्ये गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या ठिकाणी युसुफ नावाच्या व्यक्तीकडून शम्स अन्सारी उर्फ सोनू (३८) नावाच्या व्यक्तीवर गोळीबार करण्यात आला असून या गोळीबारात सोनू याच्या डोक्याला गोळी लागल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.
युसुफ नावाच्या व्यक्तीकडून हा गोळीबार करण्यात आला असून, हल्लेखोर गोळीबार करून घटनास्थळावरून पसार झाला. शम्स उर्फ सोनू (३८) याचे चष्म्याचे दुकान आहे. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास दुकानात आलेल्या एका व्यक्तीसोबत सोनू चा वाद झाला, त्यावेळी आरोपीने थेट सोनुच्याच्या डोक्यात गोळी घातली, आणि सोनू रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. शांती शॉपिंग सेंटर मधील गोळीबाराच्या आवाजाने परिसरात एकच खळबळ उडाली.



