पुण्यात गोळीबार करणाऱ्या तिघांना २४ तासात केले जेरबंद…

पुणे गुन्हेवार्ता : पुणे शहरात गोळीबार करून फरार झालेल्या ०३ बालकांना वारजे माळवाडी पोलीसांनी २४ तासात जेरबंद केले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. वारजे माळवाडी पोलिस स्टेशन हद्दीमध्ये शनिवारी (ता.१७) तीन अनोळखींनी सुरज लंगर या मुलावर बेछुट गोळीबार करून फरार झाले होते. वारजे माळवाडी पोलीस स्टेशनचे तपास पथक गोळीबार करणाऱ्यांचा रात्रंदिवस शोध घेत होते. रविवारी (ता. १८) दुपारी तपास पथकातील अंमलदार पोलीस नाईक प्रदिप शेलार व पोलीस कॉन्स्टेबल बंटी मोरे यांना त्यांचे गोपनिय बातमीदाराने बातमी दिली की, सदरचे तीन जण वारजे येथून लाल काळे रंगाचे पल्सर गाडीवरून तोंडाला रुमाल बांधून चांदणी चौकचे दिशेने जात आहेत.
तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र मुंढे व पोउपनिरी रामेश्वर पार्वे यांनी डुक्कर खिंड येथे पोलीस नाईक प्रदिप शेलार, अमोल राऊत, हणमंत मासाळ, पोलीस कॉन्स्टेबल बंटी मोरे, श्रीकांत भांगरे व विकी खिलारी यांचेसह वेगवेगळ्या टिम तयार करून चांदणी चौकाकडे जाणारे रोडवर सापळा रचून थांबले. काहीवेळाने त्याठिकाणहून तीन जण तोंडाला रुमाल बांधून एका पल्सर मोटारसायकल वरून जात असताना सापळा रचलेल्या तपास टिमने हेरले व त्यांना शिताफिने ताब्यात घेतले. त्यापैकी दोन जणांच्या कमरेला देशी बनावटीचे दोन गावठी पिस्टल मिळून आले. वारजे माळवाडी पोलीस स्टेशनचे तपास पथकाने अवघ्या २४ तासात रात्रंदिवस तपास करून गोळीबार करून फरार झालेल्यांना जेरबंद केले आहे.
सदरची कामगीरी ही पोलीस आयुक्त रितेश कुमार, संदिप कर्णीक, सह-पोलीस आयुक्त, पुणे शहर, प्रविणकुमार पाटील, अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, सुहेल शर्मा सो, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – ३, पुणे शहर, भिमराव टेळे साो, सहा. पोलीस आयुक्त, कोथरुड विभाग, पुणे शहर, यांचे मार्गदर्शनाखाली वारजे माळवाडी पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) दत्ताराम बागवे, यांच्या आदेशान्वये तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र मुंढे, पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर पार्वे, पोलिस नाईक प्रदिप शेलार, अमोल राऊत, हणमंत मासाळ, पोलीस कॉन्स्टेबल बंटी मोरे, श्रीकांत भांगरे, विकी खिलारी यांनी केलेली आहे.



