भारत

अहमदाबादचे सरदार वल्लभभाई पटेल विमानतळ पाण्याखाली; प्रवाशांचा संताप

अहमदाबाद : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळं गुजरातमध्ये अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळं नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच आता अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावर पूरस्थिती निर्माण झाली आहे. विमानतळ परिसरात गुडघाभर पाणी साचल्याने अनेक प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. त्यानंतर आता अहमदाबाद विमानतळावर पूर आल्याने धावपट्टी आणि टर्मिनल भाग पाण्याखाली गेल्याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. विमानतळ तुंबल्याच्या घटनेवरून काँग्रेसने सत्ताधारी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

गुजरातमध्ये गेल्या पाच ते सहा दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. शहरी भागांमध्येही संततधार पाऊस सुरू असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अहमदाबादेत होत असलेल्या पावसामुळं विमानतळ परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असून त्यामुळं अनेक विमानांचं उड्डाण उशीराने होत आहे. तसेच उड्डाणापूर्वी अनेक विमानांची तपासणी केली जात असल्याची माहिती आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक दीपक खत्री यांनी अहमदाबाद विमानतळावर साचलेल्या पाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर करत सत्ताधारी भाजपवर जोरदार टीका केली आहे. ‘गुजरातमध्ये भाजपने तब्बल २८ वर्षांपासून सत्तेत असूनही अहमदाबाद विमानतळाची अशी स्थिती आहे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आदर्श राज्य असल्याचं’ सांगत दीपक खत्री यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

शुक्रवारपासून दक्षिण गुजरात आणि सौराष्ट्रात वीजांच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळं राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. ग्रामीण भागांमध्ये नद्या-नाल्यांना पूर आला असून अनेक धरणांच्या पाणीपातळीत वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. त्यानंतर आता राज्य सरकार तसेच प्रशासनाकडून अनेक ठिकाणी मदत व बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. त्यातच आता अहमदाबाद विमानतळावर पूरस्थिती निर्माण झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने यावरून नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button