गुन्हे

अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई; ६० किलो अफू विकणाऱ्या टोळीचा केला पर्दाफाश

पिंपरी : चिंचवडच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने राजस्थान येथील अफू विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी अमली पदार्थ विरोधी पथकाने तीन जणांना बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींनी चाकणमधील म्हाळुंगे परिसरात गोडाऊनमध्ये अफूची पोती साठवून ती पॅकेटद्वारे विकणार होते. त्या अगोदरच पोलिसांनी त्यांच्यावर छापा  टाकून तब्बल ६० किलो अफू जप्त केली आहे. राकेश जीवनराम बिश्नोई, कैलास जोराराम बिश्नोई आणि मुकेश गिधारीराम बिश्नोई अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण म्हाळुंगे परिसरात गोडाऊनमध्ये राजस्थान येथील टोळी अफू साठवत असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. विरळ वस्ती असलेल्या ठिकाणी या टोळीने एक गोडाऊन भाड्याने घेतलं होतं. त्या ठिकाणी टेम्पोतून अफूची पोती आणली जात होती. अमली पदार्थ विरोधी पथकातील पोलिस कर्मचाऱ्यांनी आठ दिवस गोडाऊनवर लक्ष ठेवलं. अखेर मुख्य सूत्रधार राकेश जीवनराम बिश्नोई याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. मग गोडाऊनमध्ये जाऊन ६० किलो अफू पोलिसांनी जप्त केली. त्याची किंमत आठ लाख ७४ हजार रुपये असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाचे संतोष पाटील यांनी दिली आहे.

अफूची छोटी-छोटी पॅकेट करून ती नशा करणाऱ्या व्यक्तींना विकली जाणार होती. एक किलो अफूची किंमत १५ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अफूचा साठा राजस्थान येथून आणला असल्याचं समोर आलेलं आहे. याप्रकरणी राजस्थानमधील आरोपीचा शोधदेखील पोलिस घेत आहेत. ही कारवाई पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, अप्पर पोलिस आयुक्त वसंत परदेशी, पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक संतोष पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत महाले पोलिस उपनिरीक्षक राजन महाडिक, पोलिस कर्मचारी ज्ञानेश्वर दळवी, प्रदीप शेलार, अशोक गारगोटे, बाळासाहेब सूर्यवंशी, मयूर वाडकर, संतोष भालेराव, दादा धस, अजित कटे, रणधीर माने, मितेश यादव, पांडुरंग फंदे, बाळू कोकाटे यांच्या पथकाने केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button