झोमॅटोवर ऑर्डर दिली अन् थेट तुरूंगातच पोचले; मोठ्ठं घबाड लुटणारे अट्टल चोर पोलिसांच्या जाळ्यात

अंबरनाथ : स्विगी, झोमॅटो सारख्या फूड डिलीव्हरी ॲप्समुळे घरबसल्या चविष्ट पदार्थ मागवून खायची सोय झाली आहे. अवघ्या काही वेळातंच गरमागरमा पदार्थ आपल्या हातात येतात आणि आपण ते निवांत खाऊ शकतो. मात्र या झोमॅटोवरून जेवणा मागवणे एकाला महागात पडले, त्याची थेट तुरूंगातच रवानगी झाली. वाचून चक्रावलात ना ? पण हे खरं आहे. हा तरूण कोणी साधासुधा इसम नाही तर अट्टल चोर आहे. ऑनलाइन जेवण मागवल्यामुळे तो आणि त्याचे साथीदार पोलिसांच्या जाळ्यात अडकले. शहरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. चोरी, दरोडा, लूटमार या गुन्ह्यांची तीव्रता वाढतच चालली आहे. हे कमी की काय म्हणून काही दिवसांपूर्वीच अज्ञात चोरट्यांनी चक्क एटीएमवर डल्ला मारत लाखो रुपये लंपास केले होते. पोलिस त्यांचा कसून शोध घेत होते. अखेर ते पोलिसांच्या सापळ्यात अडकलेच आणि थेट गजाआड गेले.
अंबरनाथ पूर्व भागातील पालेगाव परिसरात पटेल लो प्राईस जवळ ॲक्सिस बँकेचं एटीएम आहे. या एटीएममधून काही दिवसांपूर्वी अज्ञात चोरट्यांनी पैसे चोरले होते. याप्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हयाचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी एस एस शेख उपनिरीक्षक पोलीस आणि त्यांच्या पथकास मार्गदर्शक करीत तपासाबाबत सूचना दिल्या होत्या. मात्र त्यांचा काहीच पत्ता लागत नव्हता. पोलिसांनी मोठ्या शिताफीने तपास करून तिघांना अटक केली.
या चोरीचा मुख्य सूत्रधार कोण हे समजल्यानंतर पोलीसही अवाक झाले. सोनू पटेल असे त्याचे नाव आहे. वर्षभरापूर्वी तो ॲक्सिस बँकेच्या एटीएमचा सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. मात्र त्याला कंपनीने कामावरून काढून टाकलं. त्यानंतर सोनूने आपल्या साथीदारांची मदत घेत एटीएम मशीनची डुप्लिकेट चावी बनवून घेतली. आणि अवघ्या पाच दिवसांमध्ये त्याने एटीएम मधील तब्ब्ल चार लाख त्रेचाळीस हजार रुपये लांबवले.पैसे टाकण्याचा बहाणा करून आरोपीने आपल्या मित्रांचे एटीएम कार्ड वापरून वेगवेगळ्या दिवशी चलाखीने पैसे काढून हि रक्कम आपल्या खात्यात वळवून घेतली. मात्र एटीएममध्ये पैसे टाकण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांनी नोटांची मोजणी केली असता, त्यांना मोठी तफावत आढळली. त्यांच्या तक्रारीनंतर एटीएम चालववणाऱ्या कंपनीने सीसीटीव्ही फूटेज तपासले असता, वर्षभरापूर्वी सुरक्षारक्षकाचे काम करणारा इसम चोरी करताना आढळला. याप्रकरणी कंपनीच्या मॅनेजरने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या चोरट्यांविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला.
मात्र त्या सर्वांचेच मोबाईल बंद असल्याने त्यांना पकडायचं तरी कसं हे मोठं आव्हान पोलिसांसमोर होतं. पोलिसांनी अनेक पथकं नेमत विविध शहरांमध्ये आरोपींचा शोध घेण्यास सुरूवात केली. मात्र यश काही मिळत नव्हतं.अखेर एके दिवशी या चोरट्यांपैकी एकाने झोमॅटोवर वरून खाद्यपदार्थ मागवल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. तपास केला असता, त्याचे लोकेशन डोंबिवली येथे असल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई केली आणि तिघेही चोरटे पोलिसांच्या जाळ्यात अडकले. एटीएम लुटीप्रकरणी पोलिसांनी सोनू पटेल, तसेच त्याचा साथीदार विनयकुमार कोरे आणि राकेश यादव या तिघांना अटक करून न्यायालयात हजर केले, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी दिली. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.



