देशविदेशभारत

बॉलिवूडच्या ‘या’ कलाकारांनी राम मंदिरासाठी दिलीय मोठी देणगी

मुंबई : सध्या देशभरात श्रीरामांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. सर्व देशवासियांना फक्त २२ जानेवारीची प्रतीक्षा आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक बड्या व्यक्ती या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. या सोहळ्यात बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक स्टार्सही सहभागी होणार आहेत. आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींना राम मंदिर प्राणप्रतिष्ठेसाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. हे सेलिब्रेटी सोहळ्यात तर सहभाग तर घेणार आहेतच पण, यातील अनेकांनी श्रीराम मंदिराच्या उभारणीत आर्थिक हातभार देखील लावला आहे. या यादीत बॉलिवूड सोबतच काही साऊथ स्टार्सचा समावेश आहे. कोण आहेत हे स्टार्स ज्यांनी श्री राम मंदिरासाठी देणगी दिली आहे, जाणून घ्या.

या यादीत सर्वप्रथम अक्षय कुमारचं नाव सामील झालं आहे. २०२१ मध्ये, अभिनेत्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यात त्याने राम मंदिराच्या बांधकामासाठी अघोषित रक्कम दान केली असल्याचा खुलासा केला होता. त्यानं ही घोषणा करत लिहिलं होतं की, ‘आमच्या श्रीरामाच्या भव्य मंदिराचं अयोध्येत बांधकाम सुरू झालं ही माझ्यासाठी खूप आनंदाची बाब आहे. आता या मंदिरासाठी योगदान देण्याची पाळी आली आहे. मी त्यासाठी सुरुवात केली आहे, आशा आहे की तुम्हीही माझ्यासोबत असाल. जय सिया राम.’ असं त्याने म्हटलं होतं.

अभिनेते अनुपम खेर यांनी राम मंदिराच्या उभारणीसाठी विटा दान केल्या होत्या. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ते जेव्हा राम मंदिर पाहण्यासाठी आले होते तेव्हा त्यांनी एक व्हिडिओ शेअर करून हा खुलासा केला होता. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं की, ‘मित्रांनो! मी तुम्हाला अयोध्येत बांधल्या जाणाऱ्या ऐतिहासिक राम मंदिराची झलक दाखवत आहे. हे विशाल मंदिर बांधत असलेलं पाहून खूप आनंद झाला. रामलल्लाच्या मंदिराच्या उभारणीत प्रत्येक भक्त भक्तीभावाने योगदान देत आहे. अयोध्येच्या संपूर्ण वातावरणात जय श्री रामचा जयघोष आहे. मी भाग्यवान आहे की, माझ्या विनंतीवरून मला या मंदिराची एक वीट भेट म्हणून मिळाली. मी आभारी आहे’. असं त्यांनी म्हटलं होतं.

टीव्ही अभिनेता गुरमीत चौधरीने पडद्यावर रामाची भूमिका साकारली आहे. त्याने देखील श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी काही रक्कम दान केली आहे. गुरमीतने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याविषयी माहिती दिली आहे.

बॉलिवूडची ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांनीही या मंदिरासाठी काही रक्कम दान केली आहे. मात्र किती त्याविषयी माहिती समोर आली नाही. दक्षिण अभिनेत्री प्रणिता सुभाष हिने श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्रातर्फे राबविण्यात येणाऱ्या देशव्यापी मोहिमेसाठी एक लाख रुपयांची देणगी दिली आहे.

अभिनेता मुकेश खन्ना यांनी राम मंदिराच्या उभारणीसाठी १.११  लाख रुपयांची देणगी दिली आहे. याबाबत माहिती देताना त्यांच्या ट्विटर हँडलवर एक ट्विट करण्यात आले आहे की, ‘आज वृद्धांचे आजोबा आणि मुलांचा शक्तिमान श्री मुकेश खन्ना जी यांनी त्यांच्या भागातील आमदार अतुल भातखळकर जी यांना राम मंदिराच्या उभारणीसाठी निधी संकलन मोहिमेत १,११,१११  रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.”

दाक्षिणात्य चित्रपट अभिनेता पवन कल्याण यांनीही राम मंदिरासाठी ३० लाखांहून अधिक रुपयांची मदत केली असल्याची माहिती समोर आली आहे.

मनीष मुंद्रा : बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे ज्येष्ठ चित्रपट निर्माते मनीष मुंद्रा यांनी राम मंदिरासाठी एक कोटी रुपयांची देणगी दिली असल्याची माहिती आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button