२५ महिलांची फसवणूक करणाऱ्या लखोब्याच्या नालासोपारा पोलीसांनी आवळल्या मुसक्या

वसई : नालासोपारातील एका महिलेची शादी डॉट कॉम या संकेत स्थळावरुन फिरोज नियाज शेख याच्याशी ओळख झाली होती. या ओळखीतून फिरोजने तिच्याशी लग्न केले. त्यानंतर तिच्याकडून त्याने लॅपटॉप आणि कार घेण्यासाठी ६ लाख ५० हजार ७९० रुपये घेऊन पळ काढला.त्यामुळे आपली घोर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर सदर महिलेने नालासोपारा पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन फिरोज चा शोध सुरु केला होता.
तपासाअंती फिरोज कल्याण येथे असल्याची माहिती मिळाल्यावर नालासोपारा पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. शादी डॉट काॅम या संकेत स्थळावरुन तो घटस्फोटीत महिलांना हेरत होता.त्यानंतर त्यांच्याशी ओळख करुन लग्नाचे आमिष दाखवायचा,जमलं तर लग्न करून किंवा जवळीक साधून त्यांचे सर्व सोने चांदीचे दागिने आणि पैसे घेऊन पसार व्हायचा,अशी त्याची गुन्हे पध्दत होती.
फिरोजला अटक केल्यानंतर त्याच्याकडून ३ लाख २१ हजार ४९० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्यात अनेक महिलांचे एटीएम कार्ड,चेकबुक,६ मोबाईल,१ लॅपटॉप,महिलांचे पॅन कार्ड,क्रेडिट कार्ड,सोने-चांदीचे दागिने यांचा समावेश आहे. त्याने अशाप्रकारे २० ते २५ घटस्फोटीत आणि विधवा महिलांची फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याला वसई न्यायालयात हजर केल्यावर दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
शादी डॉट कॉम या सोशल मीडियाच्या साईटवरुन फिरोज घटस्फोटीत आणि विधवा महिलांशी ओळख करून जवळीक साधत फसवणूक करायचा,त्याला कल्याण येथून अटक करण्यात आले असून,दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नालासोपारा विजयसिंह बागल यांनी दिली.



